नवी दिल्ली – एकीकडे देशातील करोना प्रादुर्भावाचा वेग हळूहळू कमी होत तर दुसरीकडे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. याशिवाय, मृतांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसत आहे.
मागील २४ तासांमध्ये देशभरात ५३ हजार ३७० नवे करोनाबाधित आढळले, तर ६५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर पोहचली आहे.
देशातील एकूण ७८ लाख १४ हजार ६८२ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ८० हजार ६८० अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख १६ हजार ४६ जणांचा समावेश आहे.
२३ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,१३,८२,५६४ नमून्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १२ लाख ६९ हजार ४७९ नमूने काल तपासण्यात आले. आयसीएमआर कडून ही माहिती मिळाली आहे.
देशातील करोनाची स्थिती निश्चित कशी आहे हे ठरविण्याच्या दृष्टिकोनातून पुढील तीन महिने निर्णायक ठरणार आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे . आगामी उत्सवांचा काळ आणि हिवाळ्यात जनतेने कोविड-१९ बाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.


