जळगाव – जळगाव शहरातील नेरी नाका येथील वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या आधुनिक शवदाहिनीचे लोकार्पण रविवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते होणार आहे. शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ रोड येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहराचे आ.सुरेश (राजूमामा) भोळे असतील. तसेच त्यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
नेरीनाका येथील वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे शवदाहिनी साकारण्याचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. तसेच येथील विश्रांती कक्षाचे केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे नूतनीकरण करण्यात आले असून शेजारी नवीन बांधकाम करून सुसज्ज गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात गॅस शवदाहिनीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मनपा महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपातील विरोधी पक्ष नेता सुनिल महाजन आणि आयुक्त सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सामाजिक चळवळीच्या या उपक्रमाच्या लोकार्पणप्रसंगी उपस्थिती द्यावी, असे आवाहन केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर आणि वैकुंठ शवदाहिनी प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी तसेच केशवस्मृती सेवासंस्था समूहातील सर्व संचालकांनी केले आहे.
समाजोपयोगी प्रकल्प चळवळीचे केंद्र केशवस्मृती प्रतिष्ठान
केशवस्मृती प्रतिष्ठान गेल्या ३० वर्षांपासून केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यात विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून कार्यरत आहे. समाजोपयोगी प्रकल्प केवळ कार्यन्वित करणे इतकेच उद्दिष्ट न ठेवता ते चळवळीचे केंद्र बनले पाहिजे, सर्व समाज घटकांचा त्यात सक्रिय सहभाग या सर्व सेवा कार्यात असला पाहिजे यासाठी प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशिल आहे.