जळगाव प्रतिनिधी । ममुराबाद रोडजवळ सट्ट्यातील पैशाच्या वादातून तीन जणांना चार जणांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यातील चार जण संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. चार जणांना आज गुरुवार रोजी न्यायालयात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
गुरुनानक नगरातील राम उर्फ सोनू भगवान सारवान (वय-३०) पैश्यांची लॉटरी लागली होती. यासाठी २४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ममुराबाद रोडवरील सट्ट्याच्या पेढीवर सोनू सारवान, मोठा भाऊ लखन उर्फ सुनिल भगवान सारवान (वय-३२) आणि मित्र निलेश नरेश हंसकर असे तिघे सट्टापेढीवर पैसे घेण्यासाठी गेले.
पैश्यांची मागणी केल्यावर संशयित आरोपी बालन्ना लिंगन्ना गवळी याने हातात सट्ट्याची चिठ्ठी फाडून फेकून दिली, पैसे मागितल्या रागातून बालन्ना गवळी, अशोक ठाकूर, कैलास कुंभार, सतिश सपकाळे, जितेंद्र राजू गवळी या पाच जणांनी धक्काबुक्की करून बेदम मारहाण केली होती . तर कैलास कुंभारने हातातील चाकूने राम सारवान गालावर तर जितेंद्र गवळी याने हातातील तलवारीने मानेवर वार केले होते. यात राम सारवान गंभीर जखमी झाला होता त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
लखन सारवान यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी कवडे, पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, राहूल पाटील, राहूल घेटे, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे यांनी कारवाई करत बालन्ना गवळी याला खासगी रूग्णालयातून उपचार घेतल्यानंतर अटक केली तर कैलास कुंभार, सतिश सपकाळे, जितेंद्र राजू गवळी या तिघांना बुधवारी २७ रोजी सायंकाळी गुजराल पेट्रोलपंप जवळून अटक केली. तर अशोक ठाकूर हा फरार झाला आहे. चौघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.