जळगाव –कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपासून बंद येथील मेहरूण परिसरातील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय निर्जंतुकीकरण करून उघडण्यात आली. तसेच, शासकीय आदेशानुसार, इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाला पवित्र मानत विद्यार्थ्यांनी चक्क विद्यालयाच्या गेटला वंदन करीत आत प्रवेश केला.
कोरोना महामारीमुळे बंद असणाऱ्या शाळा बुधवारी २७ रोजी उघडण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचे वर्गात जाण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंग, पल्स रेट तपासण्यात आले. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थी हा मास्क घालत हातावर सेनीटायझर लावून वर्गात गेला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शीतल पाटील यांनी मुलांना वह्या वाटप केल्या.
यावेळी संस्थेचे सचिव व उपशिक्षक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना कोरोना आजार म्हणजे काय, तो कसा होतो, कशी काळजी घ्यावी याबाबत सोप्या सुटसुटीत भाषेत माहिती दिली. विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षिका उज्वला नन्नवरे, साधना शिरसाठ तसेच इतर सर्व शिक्षक कर्मचारी वृंदानी केले.