मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथराव खडसे यांनी काल राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर ते मुंबईहून जळगावसाठी रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठिक-ठिकाणी खडसेंच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे फक्त मुक्ताईनगरच नाही तर मुंबई ते जळगाव रोडवर खडसेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकनाथराव खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पहिल्यांच्या त्यांच्या मतदारसंघात म्हणजे मुक्ताईनगर येथे जात आहेत. त्यांच्या परतीचा हा दौरा व्हाया रोड असणार आहे.
या दौऱ्यादरम्यान ठिक-ठिकाणी खडसेंचं स्वागत केलं जाणार आहे. मुंबईतील घाटकोपर, भांडूप, ठाणे, कल्याण, भिवंडी यासह १४ ठिकाणी त्यांचे स्वागत होणार आहे. त्यावेळी त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षात स्वागत करतील. ते ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडेही झळकताना पाहायला मिळत आहेत.