नवी दिल्ली – संसदेच्या कॅण्टीनमधील जेवण महागले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कॅण्टीनच्या अन्नपदार्थांवरील सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीच दरवाढ लागू झाली आहे. नव्या दरानुसार शाकाहारी थाळी 100 रुपयांत, तर नॉन व्हेज बुफे पद्धतीचे जेवण 700 रुपयांत मिळणार आहे.
खासदार, संसदेतील कर्मचारी तसेच इतरांना संसद कॅण्टीनमधील जेवणासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी शाकाहारी थाळी 60 रुपयांत मिळत होती. कॅण्टीनमध्ये 3 रुपयांत मिळणारी भाकरी हाच सर्वात स्वस्त मेनू असेल. सुधारित दरानुसार चिकन बिर्याणीसाठी 100 रुपये, चिकन करीसाठी 75 रुपये, साधा डोसा 30 रुपये, मटण बिर्याणी 150 रुपये तसेच भजीसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच चहा 5 रुपये तर कॉफी 10 रुपयांत मिळणार आहे. याबरोबरच कॅण्टीनमध्ये खाद्यपदार्थांची संख्या वाढवली आहे. यापुढे शाकाहारी आणि मांसाहारी मिळून एकूण 58 खाद्यपदार्थ उपलब्ध असतील.