अंबरनाथ : रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना ट्रॅकचे मेंटेनन्स करणाऱ्या मशीनमध्ये बिघाड झाला. यामुळे ट्रॅक खाली टाकण्यात येणारे स्लीपर्स अंगावर पडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात घडल्यानंतर बदलापूर होऊन मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे दोन ते पाच वाजताच्या सुमारास हे काम सुरू होते. काम सुरू असतानाच रेल्वे रुळाखालील स्लीपर्स टाकणाऱ्या मशिनमध्ये बिघाड झाल्याने मशीन वरील स्लीपर्स अंगावर पडून तीन कामगार जखमी झाले होते. रात्री तीन वाजता हा प्रकार घडला. जखमी झालेल्या तीन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित मशीन ट्रॅकवर अडकून पडले. ते हटवण्यासाठी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने प्रयत्न केले. मात्र सकाळी सात वाजेपर्यंत मशीन हटविण्यात त्यांना अपयश आल्याने अखेर या मशीनला हलविण्यासाठी क्रेन मागविण्यात आले आहे. या क्रेनच्या साह्याने मशीन हलवण्याचे काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.
सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ते मशीन हलवण्यात आलेले नाही. दरम्यान, हा अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला याबाबत रेल्वे अधिकारी चौकशी करीत आहेत.