नवी दिल्ली | मोदी सरकारनं मनमानी पद्धतीनं केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. आज प्रजासत्ताकदिनी जवानांच्या भव्य परेडनंतर लाखो शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड दिल्लीत होणार असून, देशाच्या राजधानीत ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमणार आहे.
आजचा 72 वा प्रजासत्ताकदिन वैशिष्ट्यपूर्ण असणार असून, आज राजपथावर हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन अवघ्या जगाला होईल. यामुळं कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून दिल्लीत लष्करी छावणीचं रुप आलं आहे.
कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरीदेखील सरकारनं यावर कोणताच तोडगा काढलेला नाहीय. याच पार्श्वभूमीवर कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागं हटणार नाही, यावर शेतकरी ठाम आहेत.
दरम्यान, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पाच्या दिवशी संसदेवर शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.