जळगाव : परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून काढणे आणि तितक्;याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मते व्यक्त करून प्रसंगी वादाला तोंड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार म्हणून भालचंद्र नेमाडे परिचित आहेत. त्यांच्या लिखाणावरून नेहमीच वादविवाद सुरु असतात. नेमाडे यांनी कोसला, बिढार, जरीला, हूल, तुकाराम, हिंदू यांसारख्या दर्जेदार ग्रंथांची निर्मिती केली आहे.
‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला २०१४ साली साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या कादंबरीत लभाण-बंजारा समाजातील स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह लेखन केले आहे. यामुळे राष्ट्रीय बंजारा टायगर्सने तक्रार दाखल केली होती. ऍड. भरत पवार यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.
त्यानुसार, भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस ठाण्यात आज सोमवारी दुपारी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना एक निवेदन दिले आहे. त्यात सदर मागणी केली आहे. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर जामनेरच्या पोलीस निरीक्षकांना देखील निवेदन देण्यात आले.
दरम्यान, वसंतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटनेकडून देखील नेमाडेंचा पुरस्कार काढून घेऊन कादंबरीच्या विक्रीवर तत्काळ बंदी आणावी अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे. तर, पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्याविरोधात देखील गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.