जळगाव – अभाविप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच जळगाव महानगर जिल्ह्याच्यावतीने आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित नूतन मराठा महाविद्यालय, एस.ए.बाहेती महाविद्यालय, एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय व मु.जे.महाविद्यालय, जळगाव यांचे प्राचार्य व निवासी उप-जिल्हाधिकारी राहुल पाटील यांना प्रत्यक्ष भेटून विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित खुली करण्यात यावेत या संदर्भात निवेदन देण्यात आले.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मार्च – २०२० पासून संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालये बंद आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षाचे निकाल घोषित होऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली आणि विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणे मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला.
साधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू होतील असे अपेक्षित असतांना अद्यापही प्रत्यक्ष शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू आहे.
मात्र ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा, त्याची परिणामकारकता इत्यादी बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करून शासन झोपेचे सोंग करत आहे असे विद्यापीठ विकास मंचचे मत आहे..
तसेच २०१६ च्या विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष श्री.सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली समितीचे गठन केले आहे.
विद्यापीठ कायद्यात अनावश्यक बदल करून विद्यापीठीय कामकाजामध्ये ढवळाढवळ करणे शासनाने थांबवावे. विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप वाढविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत असून विद्यापीठ विकास मंच या भूमिकेचा जाहीर निषेध करते.
मुंबई विद्यापीठात कुलसचिवांची नेमणूक करून विद्यापीठाच्या कामकाजात अवैधरीत्या हस्तक्षेप करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला कोर्टाने फटकारले असून शासनाने यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे असे निवेदन द्वारे विद्यापीठ विकास मंचने म्हटले आहे.
यावेळी अधिसभा सदस्या मनीषा खडके, निलेश झोपे, संजय नारखेडे, अनिल जोशी, सिद्धेश्वर लटपटे, रितेश चौधरी, आदेश पाटील, चेतन जाधव, वीरभूषण पाटील, दीपक पाटील, मानस शर्मा, रितेश महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते.