मुंबई, वृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेरा दिल्यानंतर तो बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्याच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेरा देऊन सही केली होती. परंतु, या फायलीवर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सही केली होती, त्याच्या वरील मोकळ्या भागात लाल रंगाच्या पेनाने नवीन शेरा लिहण्यात आला होता. चौकशीनंतर ही फाईल बंद करावी, असा तो शेरा होता. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डीसीपी झोन 1 चे शशीकुमार मीणा यांनी दिली.
फडणवीस सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. जेजे स्कूल ऑफ आर्ट इमारतीच्या बांधकामामध्ये आर्थिक अनियमितता समोर आली होती. त्यानंतर वरिष्ठ अभियंता असलेले नाना पवार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हीच चौकशी पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल मंजुरीसाठी फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती.
परंतु, जेव्हा मुख्यमंत्र्यांकडून ही फाईल परत आली होती. त्यावेळी फायलीवर शेरा पाहून अशोक चव्हाण यांना धक्का बसला होता. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या प्रस्तावात बदल केला होता. एकीकडे सर्व अभियंत्याविरोधात चौकशी कायम ठेवली होती, तर दुसरीकडे नाना पवार यांच्याविरोधात चौकशी बंद करण्याचे आदेश दिले होते.
फायलीवर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सही केली होती, त्याच्या वरील भागात लाल रंगाच्या पेनाने छोट्या अक्षरांमध्ये शेरा लिहिलेला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांना संशय बळावला. त्यांनी पुन्हा चौकशीसाठी ही फाईल पाठवली असता त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.