यवतमाळ : उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार (38) यांच्यावर रेती तस्करांनी जीवघेना हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री 11 वाजता उमरखेड-ढाणकी रस्त्यावर गोपिकाबाई गावंडे विद्यालयाजवळ काही रेती तस्करी करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना अचानक एकाने पवार यांच्या पोटात चाकू खुपसला. काही कळायच्या आत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे अद्यापही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही.
पोलिसांनी आरोपीच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली असून रात्रीच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी वैभव पवार यांना प्रथम उमरखेड येथील शासकीय रुग्णालय आणि नंतर तातडीने नांदेड येथे खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, नायब तहसीलदार यांचेवर चाकूहल्ला झाल्याची वार्ता रात्रीच सर्वत्र पसरली होती पोलिसांनी तातडीने आरोपीच्या शोधाकरिता अधिकची पोलीस कुमक उमरखेड येथे दाखल केली आहे.