मुंबई- एकनाथराव खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दुपारी २ वाजता अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एकनाथराव खडसे यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. एकनाथराव खडसे यांनी आपल्यासोबत एकही आमदार, खासदार राष्ट्रवादीत येणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. या दरम्यान पक्ष प्रवेशाआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणत्याही पदासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीय.
तसेच एकनाथराव खडसे यांनी सांगितलं की, “कोणत्याही पदासाठी नाथाभाऊ प्रवेश करत नाही. मी आपल्या ताकदीने उभा आहे. मी मंजूर केलेली उत्तर महाराष्ट्रातील अनेक विकासकामं प्रलंबित आहेत. या विकासकामांना वेग मिळावा यासाठी सरकारची साथ हवी आहे म्हणून सरकारमध्ये असलं पाहिजे”.
एकनाथराव खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यादेखील आहेत. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलं असून राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे. एकनाथराव खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले आहेत.