जळगाव – जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादीत जळगाव या संस्थेमधील 13 शिक्षकांच्या बदल्यांविषयी उपसंचालक कार्यालयाची सचिवालयाकडे तक्रार करण्यात आली आहे.
जळगाव धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने परिशिष्ट १ नुसार वैध ठरविलेल्या कार्यकारणीमार्फतच बदल्यांचे प्रस्ताव पाठविण्यात यावे असे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना अवैध प्रस्तावांना कोणतेही प्रशासकीय ठोस कारण नसताना तेरा शिक्षकांपैकी तीन शिक्षकांच्या बदल्यांना मान्यता देण्यात आल्याने संस्थेच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बदल्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यामागे काहीतरी ‘अर्थ’कारण असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान नाशिक येथे मोठा राजकीय हस्तक्षेप घडवून तीन शिक्षकांच्या बदल्यांचा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
तीन शिक्षकांच्या बदल्यांविषयी उपसंचालक कार्यालयाची शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनुसार शिक्षण उपसंचालकांनी न्यायालयीन आदेश न पाळल्याने अवमान याचिका दाखल करण्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जळगाव धर्मदाय उपायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात जळगाव यांनी त्यांच्या शालेय शिक्षण विभागाला जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारकच्या वैध कार्यकारिणीबाबत स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करीत जळगाव येथील शिक्षणाधिकारी यांनी तेरा पैकी दहा शिक्षकांच्या बदल्यांचे प्रस्ताव प्रलंबीत करून नामंजूर केले होते. यामध्ये प्रस्तावांना धरून आलेल्या तक्रारींचाही विचार केला होता. मात्र उपसंचालक कार्यालयाकडून जळगाव धर्मदाय उपायुक्तांच्या तसेच तक्रारींचा कोणताही विचार केला गेला नसल्याचे समजते. यातून बदल्यांसंदर्भात संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.
बदली मान्यतेला स्थगीतीची मागणी
सचिवांकडे दिलेल्या तक्रारीत बदली मान्यता तत्काळ स्थगीत करून आलेल्या तक्रारींचा ऊहापोह करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उपसंचालकांच्या एकाधिकारशाहीची सुद्धा चौकशीची करण्याची मागणी करण्यात आल्याचे समजते. शिवाय सचिवांकडे दिलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक बाबीं उघड होत आहे. तसेच यात काही सामाजिक संघटना सुद्धा त्यांची तक्रार करणार असल्याची माहिती मिळालेली आहे.