जळगाव – आपली व आपल्या कुटूंबाच्या सुरक्षेसह सुरक्षित प्रवासाकरीता प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.
येथील जिल्हा नियोजन भवनात 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक माधव देवधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे प्रमुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, रस्ते अपघातात एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा अनेकांनी भोगावी लागते. रस्ते अपघातात झालेल्या मृत्युपैकी 80 टक्के मृत्यु हे दुचाकी चालकांचे असून यात तरुणांची संख्या अधिक आहे. महामार्गावर हेल्मेटचा वापर न करणे, अतिवेगाने वाहने चालविणे ही यामागची प्रामुख्याने कारणे आहे. याकरीता वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत शाळा व महाविद्यालय पातळीवर अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी घेवून देतांनाच त्यांचेकडून हेल्मेट वापराचा संकल्प पाळण्याचे आश्वासन घ्यावे. त्याचबरोबर रस्ते बनविणारी व दुरुस्त करणाऱ्या यंत्रणांनी आपले रस्ते अधिकाधिक चांगले राहण्यासाठी प्रयत्नशील रहावे. जिल्ह्यात रस्त्यांचे चांगले जाळे असेल तर त्या जिल्ह्याचा अधिक विकास होतो असेही त्यांनी सांगितले. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करतांना दुचाकी चालकांनी हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्टचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पोलीस अधीक्षक डॉ मुंढे म्हणाले की, सर्वात धोकेदायक बाब ही अपघात आहे. अनेक अपघात हे वेगाने वाहन चालविण्याने होतात. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करुनच प्रवास करावा. आपणास इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन प्रवास केल्यास घाई होत नाही. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे थ्री E चा वापर करण्यात येणार आहे. यात अपघाताला निमंत्रण देणाऱ्यांवर कारवाई करणे, (Enforcement) वाहतुकीचे नियोजन (Enginearing) आणि वाहतुक नियमांची प्रचार व प्रसिध्दी (Education) या बाबींचा अवलंब करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त श्री. कुलकर्णी म्हणाले की, वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच असल्याने प्रत्येकाने त्याचे पालन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 12 हजार 200 किलोमीटर लांबीचे रस्ते आहे. त्यापैकी 5 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात या रस्त्यांवर अद्याप एकही अपघाती स्थळ (Blockspot) निश्चित झाले नसल्याचे प्रशांत सोनवणे यांनी सांगितले. तर अपघातग्रस्ताला पहिल्या अर्ध्या तासात (Golden Hours) उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे नागरीकांनी अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेले पाहिजे असे डॉ चव्हाण यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रस्ता सुरक्षा अभियानाची संकल्पना सांगून श्याम लोही म्हणाले की, जिल्ह्यात महामार्गाचे काम सुरु असल्याने वाहनचालकांनी वाहनाची गती पाळावी. वाहतुकीचे नियम पाळतांना स्वयंशिस्त व आत्मपरिक्षण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी रस्ता सुरक्षा पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच परिविक्षाधीन सहायक मोटार वाहन निरिक्षक श्रीमती नीलम सैनानी यांनी रस्ता सुरक्षेवरील गीत गायले तर परिवहन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत पथनाट्यातून जनजागृती केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख तर उपस्थितांचे आभार कर वसूली अधिकारी, चंद्रशेख इंगळे यांनी मानले. यावेळी शहरातील महिला रिक्षा चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मोटार वाहन निरिक्षक गणेश पाटील, श्रीकांत महाजन, विकास सुर्यवंशी, सुनिल गुरव, पोलीस निरिक्षक देविदास कुणगर, सहा. मोटार वाहन निरिक्षक पांडूरंग आव्हाड, दिपक साळुंखे यांचेसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतुक शाखा, महामार्ग पोलीस, एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक, जिल्ह्यातील वाहन वितरक, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.