जळगाव प्रतिनिधी । आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना हा महाविकास आघाडीच्या कार्याला मिळालेली जनतेची दाद असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवत महाविकास आघाडीला भरभरून यश दिले आहे. तर शिवसेना हा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायत निकालांवर दिली आहे.
भाजप हा पक्ष काही तालुक्यांपुरताच उरला असल्याचा टोला मारत त्यांनी यापुढे जनता विकासासोबत राहणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून राज्याला एक अतिशय संयमी आणि कार्यक्षम नेतृत्व लाभले असून त्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी केली असून याचमुळे महाविकास आघाडीला यश लाभले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता शिवसेना हा पहिल्या क्रमांचा पक्ष बनला असल्याचा दावा ना. पाटील यांनी केला. ते म्हणाले की, आम्हाला खूप चांगले यश मिळाले आहे. तर भारतीय जनता पक्ष हा फक्त काही तालुक्यांपुरता मर्यादीत झाला असल्याचा टोला देखील ना. पाटील यांनी मारला. तर, पाळधी या आपल्या गावातील दोन्ही पॅनलचे उमेदवार हे आपलेच होते. येथील १७ जागांसाठी ५४ उमेदवार उभे होते. हे सर्व उमेदवार आपले समर्थक होते. यामुळे आपण जिंकलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करत असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.