जळगाव – तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी अंजली पाटील यांनी विजय मिळविला आहे.तसेच विजय मिळवून त्यांनी खाजामिया दर्ग्यावर जाऊन चादर चढवून सर्वांचे आभार व्यक्त केले.
तालुक्यातील भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (अंजली जान) यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता.
मात्र त्यांचा अर्ज तहसील कार्यालयाने नाकरल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथून त्यांना महिला वर्गवारीत अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. यानंतर त्यांनी नागरिकांशी भेटून त्यांच्या प्रचारा शुभारंभ वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केला होता.
आज सकाळी झालेल्या मतमोजणीतून वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी झाल्या असून त्या जिल्ह्यातील पहिल्या लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. भादली बुद्रुक गावाचे नागरिकांनी त्यांची साथ दिल्यामुळे त्यांनी ही गावाची समस्या तत्परतेने सोडवण्याचे आश्वासन दिले.