मुंबई – आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता करोना काळात समोर आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी मोठ्या प्रमाणात दिसून आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात सुमारे सतरा हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी साडेआठ हजार पदाची भरती लवकरच होणार असून त्यासाठी उद्याच जाहिरात काढण्यात येणार आहे.
आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे. उद्या (18 जानेवारी) नोकर भरतीची जाहिरात निघेल. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभागात नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून आतापासून तयारीला लागल्यास नोकरी मिळवणे शक्य होणार आहे.
कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.