जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीजवळ ममता हॉस्पिटलसमोर भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार झाला असून व एक गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली.
दुचाकीवरून जात असलेले धवल अंबादास बच्छाव व समाधान श्रीराम चंदन ( दोन्ही राहणार गुजरखेडा, ता. येवला, जिल्हा नाशिक) हे कामानिमित्त दुचाकीवरून भुसावळकडे जात होते. दरम्यान, शहरातून जाणार्या महामार्गावरून ते रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पुढे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. यात समाधान श्रीराम चंदन हा जागीच ठार झाला तर धवल अंबादास बच्छाव हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातून जाणार्या महामार्गावर अनेक अपघात घडत असतात. गेल्या आठवड्यात याच भागात एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर एकाचा बळी गेला आहे. अरूंद व खराब रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.