पटना, वृत्तसंस्था : तृतीयपंथी समुदाय हा कायमच उपेक्षित असतो. जगताना विविध पातळ्यांवर त्याला संघर्ष करावा लागतो. मात्र या सामाजिक समूहाबाबत एक आनंदाची बातमी मिळते आहे.
ही बातमी आली आहे बिहारमधून. बिहारमध्ये राहणाऱ्या तृतीयपंथी समूहासाठी मोठीच प्रगतीची संधी चालून आली आहे. आता बिहारमधील तृतीयपंथी समूहाला पोलीस खात्यात नोकरी देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं आता यासंदर्भानं घोषणाही केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये आता तृतीयपंथी व्यक्ती पोलीस शिपाई आणि सब-इन्स्पेक्टर बनतील. विशेष म्हणजे या पदांवर तृतीयपंथींची थेट नियुक्ती केली जाणार आहे. शिपाई संवर्गासाठी नियुक्तीचे अधिकार एसपीजवळ आणि सब-इन्स्पेक्टर संवर्गासाठी नियुक्तीचे अधिकार डीआयजीकडे असतील.
राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे, की राज्यात दोन्ही संवर्गांच्या नियुक्तीसाठी जेव्हा अर्ज येतील, तेव्हा प्रत्येक 500 पदांमधील एक पद तृतीयपंथी व्यक्तीसाठी राखीव असेल. यासाठी वेगळी जाहिरातही दिली जाईल. या पदांसाठी इच्छूक तृतीयपंथी व्यक्तीला बिहार राज्याचा मूळ नागरिक (citizen) असणं आवश्यक आहे. नियुक्तीदरम्यान त्याला यासाठीची कागदपत्रं सादर करावी लागतील. शिवाय तृतीयपंथी असल्याचं राज्यातील विभागानं दिलेलं प्रमाणपत्रही सादर करावं लागेल.
यासोबतच जाहिरातीनुसारच तृतीयपंथीयांनाही वयाची तीच अट लागू असेल. अनुसूचित जाती-जमातींना मिळणाऱ्या सवलतीनुसारच वयाची अधिकाधिक मर्यादा असेल. शारीरिक पात्रता आणि परीक्षेचे निकष महिला उमेदवारांनुसार असतील. 2001 सालच्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये जवळपास 41 हजार तृतीयपंथी व्यक्ती राहतात. बिहार पोलीस अधिनियम 2007 अंतर्गत आता त्यांना पोलीसदलात सामावून घेतलं जाईल.