जामनेर प्रतिनिधी । बीएचआर सहकारी पतपेढीतील घोटाळ्याचे प्रकरण सध्या गाजत असून यात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. बीएचआर प्रकरणी पारस ललवाणी बनले पुणे न्यायालयात त्रयस्थ अर्जदार म्हणून अर्ज दाखल करण्यात आला आहे.
या घोटाळ्यात पतसंस्थेच्या अवसायकाने पतसंस्थेच्या मालमत्ता अत्यंत कमी किमतीत लिलावात विकल्या गेल्याचे दाखवून संस्थेची आणि सभासदांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्रयस्थ अर्जदार म्हणून जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारसमल ललवाणी यांचा अर्ज पुण्याच्या विशेष न्यायालयाने स्वीकारला आहे. बीएचआरचा अवसायक कंडारे याने बनावट लिलाव करून बड्या मंडळीला कमी किमतीत या मालमत्ता विकल्या. पुण्यातील घोले रोडवरील ८ ते १० कोटी रुपये मूल्य असलेल्या व्यापारी गाळ्यांची अशाच पद्धतीने केवळ तीन कोटी ११ लाखांत विक्री करण्यात आली आहे. ही मालमत्ता आपण आजही पाच कोटी रुपयांत विकत घ्यायला तयार आहोत, असे पारस ललवाणी यांनी अर्जात म्हटले आहे.
जामनेरमधील सहा एकर जमीन पावणेदोन कोटी रुपयांत अशाच पद्धतीने विकण्यात आली आहे. ती आपण १२ कोटी रुपयांत घ्यायला तयार आहोत, असेही ललवाणी यांनी त्रयस्थ म्हणून दिलेल्या अर्जात म्हटले आहे. ललवाणी यांना अर्ज न्यायालयाने मान्य करून दाखल करून घेतला आहे. याबाबत ललवाणी यांनी दिनांक १२ रोजी न्यायालयासमोर आपले म्हणणे देखील मांडले आहे.