जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी, यानंतर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आला असून नाराज नगरसेवकांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
समिती सभापतीच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत विरोध असल्याचे आधीच आढळून आले होते. यामुळे शिवसेनेचा उमेदवार या निवडणुकीत जिंकेल असा अंदाज देखील मांडण्यात आला होता.
तथापि शेवटच्या दिवशी अचानक ही निवड बिनविरोध होऊन भाजपचे राजेंद्र घुगे पाटील हे स्थायी समिती सभापती विराजमान झाले. मात्र राजेंद्र घुगे पाटील यांची निवड होऊन काही तास उलटत नाही. तोच महापालिकेतील भारतीय जनता पक्षातल्या नाराज नगरसेवकांनी बैठक सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे.