जळगाव : शहरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना शिरसोली रस्त्यावरील इकरा शिक्षण संस्थेच्या कोविड उपचार केंद्रात हलविण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत १४ रुग्णांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून ‘इकरा’च्या कोविड केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना तपासणी झाल्यानंतर सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्याला कुठलीच लक्षणे नसली अथवा अतिसौम्य लक्षणे असली तर ‘इकरा’च्या केंद्रात पाठविण्याचा निर्णय नुकताच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या केंद्रात ४० रुग्ण ठेवण्याची क्षमता आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना हलविण्यासाठी एका वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘इकरा’ मध्ये असलेल्या रुग्णांना “शावैम” मधूनच दोन वेळेचे जेवण दिले जात आहे. रुग्णसेवेकरीता वसीम शेख, खुशाल सपकाळे हे कर्मचारी रुग्णांना ने-आण करणे, जेवण पोचविण्याचे कार्य करीत आहे. तसेच साफसफाई ठेवण्यासाठी ५ सफाई कामगार जिल्हा रुग्णालयातर्फे केंद्रात नियुक्त केले असून नियमित औषधांचा पुरवठा देखील ‘शावैम” करीत आहेत. या ‘इकरा’ केंद्रासाठी समन्वयक म्हणून उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण हे काम पाहत असून केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश जैन ‘इकरा’ केंद्रात रुग्णांची देखरेख करीत आहेत.