जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ आजार गुलेन बारे सिंड्रोमने (जीबीएस) ग्रस्त असणाऱ्या ९ वर्षीय बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय यंत्रणेला यश आले आहे. अशा दुर्मिळ आजाराचा बालरुग्ण “शावैम”मध्ये पहिल्यांदाच आल्यानंतर त्यास बरे करून यशस्वीपणे घरी पाठविण्यात यश मिळविले आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ९ वर्षीय बालिकेला हात-पाय हलविण्यास त्रास होत होता. उठ-बस करायला जमेनासे झाले होते. तिला तिच्या पालकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २९ डिसेंबर रोजी दाखल केले. बालरोगतज्ज्ञांनी तपासल्यानंतर लक्षात आले की, या बालिकेला नसांशी निगडित आजार असून त्यात शरिरातील स्नायू कमजोर पडत असल्यामुळे एक एक करून शरीरातील सर्व स्नायु कमजोर होत होते ,असेच राहिले असते तर श्वास कमजोर होऊन जीवितास धोका होता . हा आजार जीबीएस पद्धतीचा हा घातक आजार असल्याचे लक्षात आले. बालिकेला तातडीने उपचार सुरु करण्यात आले. तिला लवकर उपचार मिळाले नसते तर श्वास बंद पडण्याची शक्यता होती. परिणामी बालिकेचा जीव धोक्यात होता.
दहा दिवस अतिदक्षता विभागात अद्ययावत यंत्रणेद्वारे व औषधउपचार केल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी दोन दिवस निरीक्षणात ठेवले. त्यानंतर बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा होऊन तिला पूर्वीसारखे उठणे, बसणे अशी क्रिया करायला शक्य झाले . त्यानंतर तिला १० जानेवारी रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. केवळ १२ दिवसांच्या अल्पावधीतच योग्य उपचार मिळाल्याने बालिका स्वतःच्या पायावर घरी चालत गेली. जिल्हा रुग्णालयातील पहिल्यांदाच अशा आजाराचा बाल रुग्ण येऊन बरा होऊन घरी गेला आहे. याविषयी बालिकेच्या पालकांनी वैद्यकीय यंत्रणेला धन्यवाद दिले आहे.
यासाठी बालरोगतज्ज्ञ व विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे , डॉ. बालाजी नाईक, डॉ. गिरीश राणे यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैभव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले.
“गुलेन बारे सिंड्रोम हा आजार पूर्वी होऊन गेलेल्या व्हायरल वा इतर इन्फेक्शनने तयार केलेल्या शरीर प्रतिक्रियेचा भाग असून त्यामध्ये नसांच्या कमजोरीने शरीरातील स्नायू काम करेनासे होतात ,प्रसंगी जीवितास धोकाही उद्भवू शकतो. वेळेवर उपचारासाठी आल्यास रुग्णाचा जीव बरा होऊ शकतो. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी वेळेत यावे.”
– डॉ. बाळासाहेब सुरोशे, बालरोगतज्ज्ञ.