जळगाव प्रतिनिधी । श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात मंगळवारी टॉक शो झाला. अयोध्या येथे उभारण्यात येणार्या श्रीराम मंदिरातून आदर्श रामराज्य निर्मितीची पायाभरणी होणार असल्याचा सूर शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात आयोजीत टॉक शो संपन्न झाला.
यात अयोध्यानगरीतील भव्य श्रीराम मंदिर निर्माणातील विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला. अॅड. सुशील अत्रे यांनी याचे सूत्रसंचालन केले. तर यात भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, राष्ट्रसेवक समितीच्या अनघा कुलकर्णी आणि डॉ. प्रसन्न पाटील यांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीबाबत सविस्तर उहापोह केला. भारत राष्ट्राची गुंफण ही प्रभू रामचंद्रांनी केली आहे. म्हणून देशात, जगात यापुढे लाखो मंदिर उभे राहतीलही; पण या देशाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून आम्ही राष्ट्र मंदिर मानतो. मात्र सामाजिक समता असल्याशिवाय हे राष्ट्र मंदिर उभारणे अशक्य असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी यातून केले.
रामजन्म भूमीमुक्तीचा लढा हा कुणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. हा १५२८ पासूनचा आहे. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. या वेळी महासभेकडून अयोध्येतही राममंदिर उभारण्याचा प्रश्न पुढे करण्यात आला व समिती स्थापन झाली. हे आंदोलन कुण्या पक्षाची मक्तेदारी नव्हती. राजकीय दृष्ट्या या चळवळीला कोण्या पक्षाच लेबल लावता येणार नाही. सन १९९० पासून या आंदोलनाला राजकीय रंग चढवला, असे भांडारी म्हणले.
श्रीरामाच्या चारित्र्यातून आदर्श जीवन जगण्याची उर्मी मिळते. हे चरित्र राष्ट्रासाठी प्रेरणादायी, आचरणीय आहे. राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न बघताना आदर्श म्हणून रामाचा स्वीकार योग्य आहे. अध्यात्मिक साधकांसाठी रामाचे चरित्र आदर्शमय असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी केले. तर, अयोध्येच्या उभारणी कार्यात स्त्रीयांचे योगदान हे महत्वपूर्ण राहिले आहे. मात्र ते समोर आलेले नाही. पाच पिठ्या जगण्याचा व सात पिढ्यांचा उद्धार करणारी स्त्रीच आहे.
समाजकारणाला मनाने बांधणे यात स्त्रीचे योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसेवक समितीच्या अनघा कुलकर्णी यांनी केले. डॉ. प्रसन्न पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोषणमुक्त समाज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवले आहे. बंधुत्वाच्या आधारावर प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे, जातीय अस्मिता टोकदार करण्याचे प्रयत्न सद्या केले जात आहेत. यापुढे सामाजिक भेद दूर करून राष्ट्र बलवान करण्याचे प्रयत्न असावेत, असे प्रतिपादनही त्यांनी केले.