जळगाव – शहरातील शिवकॉलनी परिसरात १९८५ मध्ये रहिवासी संकुल बांधण्यात आले असून त्याठिकाणी अमृत योजनेसाठी पाण्याची टाकी बांधण्याची व्यवस्था नाही. प्रत्येकाला स्वतंत्र नळ संयोजन द्यावे यासाठी शिवकॉलनीवासियांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी पाहणी करून योग्य तो मार्ग काढण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या.
जळगाव शहरात अमृत योजनेचे काम सुरू असून नागरिकांना नळ संयोजन देण्यात येत आहे. शिवकॉलनीतील काही रहिवासी संकुल जुनाट असून त्याठिकाणी भूमीगत पाण्याची टाकी, जमिनीलगत साठवण टाकी करण्यासाठी किंवा छतावर पाण्याची टाकी ठेवणे शक्य नसल्याने नागरिकांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी आयुक्त सतिष कुलकर्णी यांना देखील निवेदन दिले. प्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रा.सचिन पाटील, प्रतिभा देशमुख, गजानन देशमुख, शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, योगेश बोरोले आदी उपस्थित होते.
नगरसेवक प्रा.सचिन पाटील यांनी नागरिकांची संपूर्ण अडचण आणि परिस्थितीची माहिती महापौर आणि आयुक्तांना दिली. आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी, एकाच नळ संयोजनावरून २० नळ संयोजन दिल्यास पाण्याचा दबाव कमी होऊ शकतो. त्यात कुणीही विद्युत मोटारीने पाणी ओढल्यास इतरांना पाणी मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते असे सांगितले. तसेच त्याठिकाणी पाहणी करून काही तोडगा निघू शकेल का याबाबत आयुक्तांनी अभियंत्यांना सूचना दिल्या.
नागरिकांनी महापौर आणि आयुक्तांना निवेदन देत जमिनी लगत, भूमीगत टाकी तयार केल्यास जुन्या इमारतींना धोका आहे. एकाच साठवण टाकीतून पाण्याचे असमान वितरण आणि वापर झाल्याने वाद होण्याची शक्यता आहे. नवीन टाकीच्या बांधकाम खर्चास जबाबदार कोण, संयुक्तिक नळ संयोजनची पाणीपट्टी भरण्यास अपार्टमेंटमधील कुणी नकार दिल्यास कोण जबाबदार राहणार असे प्रश्न मांडणारे निवेदन दिले.