जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले. दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज साखळी उपोषण करण्यात आले.
शहरात राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 11 ते 17 जानेवारी दरम्यान साखळी उपोषण करण्यात येत असून रोज जिल्हयातील वेगवेगळ्या तालुक्यातील शेतकरी उपोषणात सहभागी होणार आहे. गेल्या 45 ते 47 दिवसांपासून दिल्ली येथे विविध संघटनांकडून शेतकरी हित विरोधी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.
परंतु केंद्रशासन याकडे सोयीस्कररित्या दूर्लक्षच करीत आहे. याचा निषेध म्हणून तसेच दिल्ली येथील आंदोलनाला पाठींबा म्हणधून राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. शेतकरी हित विरोधी कायदे रद्द न केल्यास जेलभरो आंदोलन देखील करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. साखळी उपोषणात किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, राज्याध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, जिल्हाध्यक्ष विश्वासराव पाटील, सिताराम सोनवणे, राहुल सपकाळे, दिलीप अहिरे, प्रदीप मगर, वाय.एस.महाजन, सुनील देहडे, हाजी गफ्फार मलिक, आदी पदाधिकार्यांसह जामनेर व जळगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.