मुंबई : प्रायव्हसी पॉलिसी बदलल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएपला चांगला फटका बसला आहे. प्रायव्हसीच्या नव्या फंद्यामुळे यूझर्सनी सिग्नल मेसेजिंग अॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यास सुरुवात केली आहे. या क्रॉस-प्लॅटफॉर्म एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिस सिग्नल अॅपने भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. सध्या सगळ्यात जास्त सिग्नल हा ऍप डाऊनलोड करण्यात येत आहे.
शनिवारी सिग्नलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत भारतात व्हॉट्सअॅपला मागे सारत सिग्लनने पहिलं स्थान मिळावल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. फक्त भारतातच नाही तर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, हाँगकाँग, स्वित्झर्लंडमध्येही सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्समध्ये हा अव्वल स्थानावर आहे.
रॉयटर्सने त्यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, सेन्सर टॉवर डेटाचा हवाला देत गेल्या दोन दिवसांमध्ये सिग्नल अॅप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर 100,000 पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केला आहे. इतकंच नाही तर, 2021 च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपच्या नवीन यूजर्समध्ये 11 टक्क्यांनी घट झाली असल्याचंही समोर आलं आहे.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांनी व्हॉट्सअॅपच्या नव्या घोषणेनंतर सांगितलं की, सिग्नल अॅप हा सुरक्षित असल्यानं तो चांगल्या प्रकारे वापरला जाऊ शकतो. त्यांच्या अशा ट्वीटमुळे या अॅपला डाउनलोड करण्याची प्रक्रिया वापरकर्त्यांनी सुरू केली, जी अजूनही सुरू आहे.