मुंबई – ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट केले की,”भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला. तो फडणवीसांनी करायला लावला याचा मनस्ताप झाला. या सर्व मानसिक छळामुळेच पक्षांतराचा निर्णय घेतला.
गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे किती तरी नेते होते. त्यांच्यासोबत आजपर्यंत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पदे दिली. मी ती नाकारू शकत नाही.
मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यांवर टीका केली नाही. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नसल्याचे सांगितले आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत. माझी भाजपविषयी तक्रार नाही. केंद्रीय नेतृत्व किंवा प्रदेश कार्यकारिणीवर नाराज नाही. केवळ देवेंद्र फडणवीसांवर नाराज असल्यानेच भाजपला सोडचिठ्ठी देत आहे, असे खडसे यांनी सांगितले.
पक्षासाठी उभे आयुष्य घालवले. परंतु माझ्या चौकशा फडणवीसांनी लावल्या. त्यामुळे बदनामी सहन करावी लागली. मला काय मिळाले वा नाही, याच्याशी घेणे-देणे नाही. माझ्या कथित स्वीय सहायकावर नऊ महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली. त्याची कबुली सभागृहात फडणवीसांनी दिली असे खडसे यांनी स्पष्ट केले.