जळगाव – शहरात अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत असून दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने नागरिकांची ओरड होत आहे. प्रत्येक विभागाने एकमेकांशी समन्वयक ठेवून तात्काळ दुरुस्तीची कामे करावी अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या. तसेच अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या मक्तेदाराला चाऱ्या बुजण्याच्या देखील सूचना केल्या.
शहरातील साफसफाई, एलईडी, बांधकाम विभाग, अमृत योजना, भूमीगत योजनेचे मक्तेदार प्रतिनिधी यांची बैठक घेत शनिवारी महापौरांनी चांगलीच कानउघडणी केली. बैठकीला महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, अमृत, भूमीगत योजनेचे मक्तेदार प्रतिनिधी, आरोग्य निरीक्षक तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.
भूमीगत गटारींच्या चेंबरची तपासणी करणार
शहरात भूमीगत गटारींच्या कामासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले आहे. भूमीगत गटारींच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये विविध शंका असून त्यामुळे गैरसमज पसरत आहे. मक्तेदाराला सूचना देऊन गैरसमज दूर करण्यासाठी त्या चेंबरची तपासणी करण्याचे सांगितले. शहरात मुख्य ९ हजार पैकी ४ हजार चेंबर पूर्ण झाले असून त्याठिकाणी चेंबरची धारण क्षमता तपासणीसाठी लोड टेस्ट करण्यात येणार असल्याची मक्तेदार प्रतिनिधीने दिली. तसेच कामासाठी वापरण्यात येणाऱ्या विटा, वाळू, सिमेंटचा दर्जा, गुणवत्ता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तपासणी करून तसे प्रमाणपत्र घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. २५ जानेवारीपासून मशीनद्वारे दररोज ५ याप्रमाणे १० दिवसात वेगवेगळ्या प्रभागातील ५० चेंबरची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी करताना मनपा पदाधिकारी आणि अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
एलईडीच्या कामाला सोमवारपासून मिळणार गती
शहरात एलईडी बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मक्तेदार सोमवारपासून कामगार वाढविणार असून दररोज किमान ३५० एलईडी बसविण्यात येतील. कामगार वाढणार असल्याने सोमवारपासून कामाला गती मिळणार असून एक-एक रोहित्रच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व खांबावर एलईडी टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
अमृत, भूमीगतच्या चाऱ्या बुजवून सफाई करा
अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या चाऱ्या बुजविल्यानंतर शिल्लक असलेली बारीक खडी तात्काळ उचलण्यासाठी मनपाचे मनुष्यबळ वापरून काम करावे. मक्तेदारांची मदत घ्यावी. सोमवारपासून एकही परिसरातून तक्रार येता कामा नये. आरोग्य विभागाने झाडूने साफ करून घ्यावे अशा सूचना महापौरांनी दिल्या.
शहरात पुढील आठवड्यापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात
गोलाणी मार्केटच्या तळघरात पाणी साचते ते सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. शहराच्या साफसफाईसाठी ५ झोन पाडण्यात आले आहेत. एकाच दिवशी संपूर्ण परिसराची स्वच्छता होण्यासाठी नियोजन करण्यात आले असून महापौर सौ.भारती सोनवणे यांनी याबाबत स्वच्छता निरीक्षकांना सूचना दिल्या.
रस्ते दुरुस्तीच्या कामाची होणार पाहणी
शहरात प्रत्येक प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने मक्ता दिलेला आहे. काही प्रभागात अद्यापही काम सुरू झालेले नसून नागरिकांची ओरड होत आहे. कामाचा दर्जा तपासण्यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अचानक पाहणी करणार आहेत.