पारोळा प्रतिनिधी । शहरात लग्नासाठी आलेल्या एकाची कार मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ५ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील जगमोहनदास नगर येथील मित्राच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे शिरपूर येथील जितेश उध्दवदास खेमाने (वय-३७) हे कारने आपल्या कुटुंबियांसह ५ जानेवारी रोजी सकाळी आले होते. सायंकाळी हळदीचा कार्यक्रम होता. रात्री १० वाजता मित्राच्या घरासमोर कार (एमएएच १८ बीस ८२२२) पार्किंग करून लावली होती. ६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता कार जागेवर दिसली नाही.
जगमोहनदास परिसरात सर्वत्र शोध घेवूनही कार मिळाली नाही. ६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता पोलीसात धाव घेतली. जितेश खेमानी यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर पाटील करीत आहे.