अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खेडी येथील महिलेच्या मृत्यूनंतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यातील खेडी येथील उषाबाई पाटील यांनी ४ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेजार्यांच्या त्रासाला कंटाळून आईने आत्महत्या केल्याचा आरोप उषाबाई यांचा मुलगा सतीश पाटील यांनी केला होता. यासाठी त्यांनी मंगळवारी रात्री मृतदेह अमळनेर पोलिस ठाण्यात आणून त्रास देणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर डीवायएसपी राकेश जाधव यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान, सतीश पाटील यांनी अमळनेर पोलीस स्थानकात फिर्याद दिली.
यात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२० मध्ये भगवान पंडित पाटील, जयेंदबाई भगवान पाटील, कमलेश भगवान पाटील यांच्या घरी जावळाचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्याच्या आईने घराच्या ओट्यावर पिंपळाचे झाडाजवळील विखुरलेला नेवैद्य पायाखाली येतो असे कमलेशला सांगितले. त्याचा राग आल्याने भगवान, जयेंदबाई, कमलेश, अमोल भगवान पाटील, विजय लक्ष्मण पाटील, मोहिनी विजय पाटील, विजूबाई पीतांबर पाटील, भटाबाई प्रवीण पाटील, मयूर प्रवीण पाटील यांनी तिला शिवीगाळ व मारहाण केली.
याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. मात्र यात दोन्ही बाजूंनी सामोपचाराने हे प्रकरण मिटविले होेते. मात्र यानंतरही एप्रिल व ऑक्टोबरमध्ये पुन्हा उषाबाईंना मारहाण व शिवीगाळ झाली. ९ ऑक्टोबरला सकाळी उषाबाई झाडू मारत असताना सर्व आरोपींनी शिवीगाळ व दगडफेक करून जखमी केले. १८ डिसेंबरला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी पोलिसांनी तक्रार न नोंदवता मनोरुग्ण ठरवून उषाबाईला हाकलून दिले. यानंतरही आरोपींनी २६ डिसेंबरला धमकी देऊन घराला कुलूप लावले. या त्रासामुळे ४ जानेवारीला उषाबाईंनी आत्महत्या केली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.