लाहोर – मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर रहमान लखवी याला आज पाकिस्तानात अटक करण्यात आली. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. लखवी हा सन 2015 पासून जामीनावर बाहेर आहे. त्याला आज पंजाब प्रांतातील दहशतवाद विरोधी विभागाकडून अटक करण्यात आली. मात्र त्याला नेमकी कोठे अटक करण्यात आली वगैरे तपशील त्यांनी दिलेला नाही.
61 वर्षीय लखवी हा पाकिस्तानात अनेक धर्मादाय संस्था व दवाखाने चालवत होता. या धर्मादाय कार्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा केल्या आहेत. व हे पैसे तो दहशतवादी कारवायांसाठी वापरत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी आणि समुदायांनी त्याच्या कारवायांवर आक्षेप घेत त्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सातत्याने पाकिस्तान सरकारकडे केली आहे. पण त्याविषयी पाकिस्तानकडून सतत टाळाटाळ चालली होती. ( 26/11 mastermind Lakhvi arrested )
संयुक्तराष्ट्रांनीही त्याच्यावर निर्बंध लागू केले आहेत. मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील सारी सूत्रे त्यानेच हलवली होती याचे सज्जड पुरावेही उपलब्ध आहेत. पण आज त्याला दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर लाहोरच्या दहशतवाद विरोधी कोर्टात खटला चालवला जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.