जळगाव (प्रतिनिधी) : दिवसभर रुग्णसेवेत असणारे हात गुरुवारी काही काळ विसावले…अन् हातात चक्क ब्रश घेऊन त्यांनी भित्तीचित्रांवर रंगकाम करीत स्वतःच्या कलेला आणि प्रतिभेला वाट मोकळी करून दिली. यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारामध्ये गेल्या दहा दिवसांपासून भित्तिचित्र रंगवण्याचे आणि सुशोभित करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना तसेच विविध प्रमाणपत्र काढण्यास येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न वाटावे, त्यांना उपचार घेताना प्रफुल्लित वाटावे या दृष्टीने ही मन प्रसन्न करून टाकणारी चित्रे लक्ष वेधून घेत आहेत.
महाविद्यालय व रुग्णालय आवारामध्ये फ्लॉवर्स व्हॅली, वारली संस्कृती, निसर्ग चित्र तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांची मांडणी जिल्हा रुग्णालयाच्या व महाविद्यालयाच्या आवारांमध्ये भिंतीवर करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे राज्यभरातून सर्वत्र कौतुक होत आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ वैभव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील कर्मचारी हे ओरिसातील फाईन आर्ट्सचे प्राचार्य अविनाश काटे, प्रा.वैशाली काटे यांना भित्तिचित्र रंगवण्याच्या कामात सहकार्य करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील भिंतींवर रुग्णालयातील घटक उदा. डॉक्टर, परिचारिका, विविध रुग्ण,लहान बाळ, दिव्यांग व्यक्ती यांच्या चित्रांना रंगवण्याची इच्छा कर्मचाऱ्यांनाही झाली. त्यांच्यातील प्रतिभा त्यांनी जागृत करीत हातात ब्रश घेतला. प्राचार्य अविनाश घाटे यांनी स्केच केलेल्या चित्रांमध्ये त्यांनी अप्रतिम आणि अविश्वसनीय अशा निष्णात रंगकाराप्रमाणे रंग भरले. यामुळे गुरुवारी रुग्णालयाच्या आवारात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.
रुग्णालयात कर्मचारी रुग्ण सेवेमध्ये कायम असतात. तसेच कोरोनाच्या काळात गेल्या आठ महिन्यांपासून अविरत सेवेमध्ये कर्मचारी आहेत. अशा कर्मचाऱ्यांनी रंगकाम करण्यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये अनिल बागलाणे, प्रकाश सपकाळ, राजेंद्र करोसिया, दिनेश कंडारे, प्रमोद कोळी, राहुल सपकाळ यांचा समावेश होता.