चोपडा – येथील तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीला सुमारे दहा कोटी रुपयांची एक रकमी सबसिडी मिळाल्यामुळे प्रकल्प आर्थिक चणचण संपून स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करणार आहे. तालुक्याच्या सभासद व शेतकऱ्यांना सुतगिरणीचा प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून स्वतःची जिनिंग प्रेसिंग कार्यस्थळावर सुरु करणार असल्याची घोषणा करीत पंधरा दिवसात भुमिपूजन करणार असल्याचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी पुढे बोलतांना माजी आमदार पाटील म्हणाले की, सूतगिरणी प्रकल्प तालुक्याला वैभवशाली बनविण्याकडे वाटचाल करीत असतांना सद्यस्थितीत १०० कोटींचा प्रकल्प उभा झाला आहे.सुतगिरणी उभी करतांना राज्य शासनाची मोठी मदत झाली २७ कोटी रुपये भागभांडवल शासनाने उपलब्ध करुन दिले. शेतकऱ्यांनी तीन करोड रुपये भाग भांडवल उपलब्ध झाले.त्यामुळे चोपडा तालुक्यात सूतगिरणीचा युवकांना रोजगार देणारा प्रकल्प उभा राहू शकला.त्यासाठी एन.सी.डी.सी. ने ४४ कोटींचे कर्ज मंजूर करुन खूप मोठा हातभार लावला.
आपल्या प्रकल्पाची सुरूवात २३ मार्च २०१७ झाली अन पहिल्या आर्थिक वर्षांपासून केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने आपल्याला सबसिडीची रक्कम देवू केली.त्यामध्ये २०१६-१७ ला ९० लाख ५८ हजार ४०० रुपये तर २०१८-१९ ला ३२ लाख १९ हजार ४०० रुपये सबसिडी प्राप्त झाली.तसेच २०१९-२० मध्ये ६४ लाख ८६ हजार ७०० रुपये व ८५ लाख रुपये सबसिडी प्राप्त झाली.तथापि केंद्राकडे राहिलेली सबसिडी सात वर्षे टप्प्याने मिळणार असल्याची करारात अट होती.
परंतु अश्या कालावधीने सबसिडी मिळाली तर प्रकल्पाचे व्याजात मोठा भाग जाईल.त्यामुळे सूतगिरणी स्वयंपूर्ण होण्यात अडचण येईल याचा विचार करुन व्हाईस चेअरमन पी.बी.पाटील व संचालक मंडळ सदस्यांनी एकजुटीने प्रयत्न करुन सबसिडीची रकम लवकरात लवकर एक रकमी मिळावी म्हणून दिल्लीत जावून कसोशीने प्रयास केले.त्याला यश आले असून सूतगिरणीला एन.सी.डी.सी.ने ९ कोटी ९० लाख ३० हजार पाचशे रुपये सबसिडी खात्यावर प्राप्त झाल्याचे पत्राने कळविले आहे.त्यामुळे सूतगिरणीची आर्थिक चणचण संपणार असून प्रकल्प आत्मनिर्भर होण्यास मदत होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याची सबसिडीही मिळविणार
आपल्या सूतगिरणीने २५ हजार ९०० चाते पूर्ण क्षमता असलेले उद्दिष्ट देखील नुकतेच पार केले आहे.सक्षमपणे पूर्ण क्षमतेने सूतगिरणी चालु असल्याचे परिक्षण एन.सी.डी.सी.कडून झाल्यावर त्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य शासनाला सादर केल्यानंतर सुमारे १८ कोटीची सबसिडी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.या सबसिडीची रक्कम त्वरित मिळावी म्हणून कंबर कसणार असल्याचे माजी आ.पाटील यांनी सांगितले.
पंधरवाड्यात जिनिंग प्रेसिंगचे भुमिपुजन
तालुक्यात शेतकऱ्यांच्या योगदानातून सूतगिरणी सुरु झाली.पण त्याचा काय फायदा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत होता.त्याचा विचार सूतगिरणी संचालक मंडळाने वारंवार केला.तेव्हा काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अधिक मोबद्दला देता यावा म्हणून आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सूतगिरणी संचलित ‘रेलचा मारुती जिनिंग प्रेसिंग’ सुरु करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.आगामी पंधरा दिवसात जिनिंग प्रसिंगचे भुमिपूजन करणार असल्याची घोषणा माजी आमदार पाटील यांनी यावेळी केली.
व्हा.चेअरमन पी.बी.पाटील, संचालक प्रकाश रजाळे,तुकाराम पाटील, डिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, राहुल विस्कर,के.डी.चौधरी,शशीकांत पाटील, भाऊसाहेब पाटील, भागवतराव पाटील, रामदास चौधरी,रंजना नेवे,जागृती बोरसे,जनरल मॅनेजर विजय पाटील सूतगिरणीतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.