जळगाव प्रतिनिधी । शहरातील सानेगुरूजी कॉलनीत वृद्ध महिलेची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथे सुलोचना विश्वासराव पाटील या मुलगा डॉ. योगानंद पाटील, सून डॉ. ललीता पाटील, व नातवंडासह वास्तस्यास आहेत. २७ डिसेंबर रोजी त्या परिवारासह जळगाव जिल्हयात एरंडोल येथे शेती असल्याने त्या बघण्यासाठी आल्या होत्या. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास सुलोचना ह्या जळगाव शहरातील सानेगुरूजी कॉलनी येथ राहत असलेल्या त्याच्या आई निलावंती कृष्णा पाटील यांना भेटण्यासाठी आल्या.
यावेळी चारचाकीतून उतरल्यानंतर त्यांचा मुलगा हा गावात निघून गेला. यावेळी सुलोचना ह्या सानेगुरूजी गार्डन जवळून जात असतांना त्याच्या पाठीमागून अंदाजे ३० ते ३५ वर्षाचा चोरटा आला. त्याने सुलोचना याच्या गळ्यातील ९६ हजार रुपयांची दोन तोळ्याची सोन्याची पोत व ४८ हजार रुपयांचे एका तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने तोडून एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. यानंतर चोरटा काही अंतरावर उभ्या असलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकीवर बसून पसार झाला.
याप्रकरणी सुलोचना पाटील यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.