बोदवड – येथे चार जिनिंगमध्ये सीसीआयतर्फे कापूस खरेदी केला जातो. मात्र चारही कापूस खरेदी केंद्रांवर शेतकर्यांची पिळवणूक होत असल्याची तक्रार करण्यात आल्याने याला तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
या सर्व केंद्रांवर शेतकर्यांपेक्षा व्यापार्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात असल्याची तक्रार करण्यात येत आहे. यात शेतकर्यांना कधीपासूनच नंबर लावून देखील त्यांचा कापूस मोजला जात नाही. तर व्यापार्यांचा कापूस मात्र तातडीने मोजला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कापूस तोलाई, हमालीचे दर आदींसोबत आता शेतकर्यांच्या कापसातून क्विंटलमागे दोन किलोंची कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकर्यांची पिळवणूक त्वरित थांबवून शेतकर्यांचे कपात केलेले सर्व पैसे परत करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. यावेळी विनोद पाडर, हर्षल बडगुजर, शांताराम कोळी, कलीम शेख, नईम खान बागवान, गोपाल पाटील, अतुल माळी, प्रवीण जैन उपस्थित होते.