जळगाव- आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी व त्यांची कोणी फसवणूक केली तर त्यांनी कुणाकडे दाद मागावी याची सविस्तर माहिती देत ग्राहकांनी आपल्या बरोबर इतरांना जागृत करावे असे आवाहन राज्य आरोग्य समितीचे अध्यक्ष विजय मोहरीर यांनी केले आहे.
राज्य आरोग्य समितीचे अध्यक्ष विजय मोहरीर यांनी आरोग्य सेवेबद्दल रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी बाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी कोरोना काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून योग्य सेवा मिळाली नसल्यास ते आरोग्य समितीकडे तक्रार करू शकतात. यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आरोग्य समिती व आयएमए संघटनेच्या माध्यमातून संयुक्त अभियान चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या अभियानांतर्गत ज्या रुग्ण ग्राहकांना त्रास होईल त्यांना तक्रार करावयची असेल तर ती कुठे करावी याची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. रुग्णांवर वैद्यकीय सेवेबद्दल अन्याय झाल्यास त्यांनी आयएमएकडे लेखी तक्रार करणे आवश्यक आहे. तेथे न्याय नाही मिळाला तर ग्राहक पंचायतीकडे तक्रार दाद मागता येते. येथेही समाधान न झाल्यास ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात त्याच्याकडे तक्रार करता येऊ शकते. जिल्हाधिकारी यांच्याकडे योग्य तोडगा न निघाल्यास थेट मेडिकल कॉन्सिलकडे ग्राहक तक्रार करू शकतो अशी माहिती श्री. मोहरीर यांनी दिली. ग्राहकांनी तक्ररार न करण्याची मानसिकता बदलून कायदाचा वापर करून घेतला पाहिजे असे मत मोहरीर यांनी व्यक्त केले.