जळगाव – तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे केंद्र शासनाकडून यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. युवा संसदसाठी जिल्हास्तरावर ऑनलाईन पद्धतीने संसद घेण्यात येणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.
तरुण, तरुणी, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसीत व्हावे, देशाच्या समाजकारणाचे महत्व त्यांना कळावे यासाठी केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन करण्यात येत असते. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर आपली निवड होणे आवश्यक असते. जळगाव जिल्ह्याची युवा संसद दि.२८ आणि २९ डिसेंबर रोजी होणार आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आवाहन
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा पुरावा, रहिवासाचा पुरावा, पासपोर्ट फोटोसह आपले अर्ज नेहरू युवा केंद्र, प्लॉट क्र.६०, गट क्र.४०, द्रौपदी नगर, मानराज पार्कजवळ, जळगाव याठिकाणी कार्यक्रम सहाय्यक अजिंक्य गवळी यांच्याकडे दि.२७ डिसेंबरपर्यंत जमा करायचे आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी फोन क्र.०२५७-२९५१७५४ किंवा [email protected] यावर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष राहणार असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र मिळणार आहे. जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत आपला मुद्दा मांडता येणार असून राष्ट्रीय स्तरावर हिंदी आणि इंग्रजी भाषाच आवश्यक आहे.
महत्वपूर्ण विषयावर विद्यार्थी मांडणार मत
जिल्हास्तर युवा संसदमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी ४ मिनीटे वेळ मिळणार आहे. स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० भारतातील शिक्षणाचे परिवर्तन करेल, उन्नत भारत अभियान – समुदायांची शक्ती मुक्त करणे आणि त्यांच्या उन्नतीसाठी तंत्रज्ञान वापरणे, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्था अनलॉक करणे, शेतकर्यांसाठी वरदान – शून्य बजेट नैसर्गिक शेती या विषयावर विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्व सादर करायचे आहे.
राष्ट्रीय स्तरावर लाखोंची बक्षीसे मिळणार
राज्यस्तरीय युवा संसदसाठी जळगाव जिल्ह्यात आयोजित स्पर्धेतून २ विद्यार्थी निवडले जाणार असून राज्यातून ३ विद्यार्थी देशस्तरावर सहभागी होण्यासाठी निवडले जातील. राज्यस्तरीय स्पर्धा दि.१ ते ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. राष्ट्रीय युवा संसद दि.१२ आणि १३ जानेवारी रोजी संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार असून विजेत्यांना प्रथम बक्षीस २ लाख, द्वितीय १.५ लाख, तृतीय बक्षीस १ लाख असणार आहे.