जळगाव – युकेमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिली.
राज्य शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. राऊत बोलत होते. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असताना युकेमध्ये आता कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच सध्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने निमोनियासारखे आजार बळावतात. याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याने मनपा क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवेसारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात येत आहे. मात्र यासाठी पुरेसे पुरावे सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच रात्री बाहेरगावावरुन येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र नागरीकांनी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम रात्री 11 पूर्वीच उरकणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गास कोणतीही अडचण येवू नये याकरीता या कालावधीत त्यांच्या कामाच्या वेळा या रात्री 11 पूर्वी व सकाळी 6 नंतर ठेवण्याबाबत आस्थापनांना सुचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. याकरीता 33 ऑक्सिजन सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही परिस्थितीस प्रशासन सज्ज असले तरी नागरीकांनीही सतत मास्कचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाताना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
31 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात राहणार संचारबंदी
31 डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता 31 डिसेंबरच्या रात्री 11 ते 1 जानेवारीच्या सकाळी 6 या वेळेत जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातही संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई – डॉ मुंढे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी केले आहे. जे नागरीक या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांचेवर दंडात्मक कारवाई बरोबरच आवश्यकता भासल्यास गुन्हेही दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना पोलीस स्टेशनच्या प्रभारी यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पॉईट तसेच पेट्रोलिंग करणाऱ्यांमार्फतही तपासणी करण्यात येणार आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीस व महापालिकेचे संयुक्त पथक कारवाई करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.