जळगाव – शहरातील खोटे नगरमध्ये मध्यरात्री बंद घरातून १० हजाराची रोकड लांबविलीची घटना २१ रोजी सोमवारी सायंकाळी घडली. तालुका पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जे. के. सिड्स कंपनीत एरीया मॅनेजर नितीन कुमार महाले (वय-३७ रा. एरंडोल जि.जळगाव ह.मु. मयूर हौसिंग सोसायटी खोटे नगर) हे एकटे राहतात. कोरोनामुळे त्यांनी हे घर भाड्याने घेतले होते. तसेच ते सध्या काही दिवसांपासून एरंडोल येथे कुटुंबियासोबत राहत होते.
१४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ते घराला कुलूप लावून कामावर निघून गेले. त्यानंतर ते एरंडोल ते जळगाव असे अपडाऊन करत होते. दरम्यान, सोमवार २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या घराचे मालक यांनी घरफोडी झाल्याने महाले यांना कळविले. त्यानुसार महाले हे घरात येवून पाहणी केली असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटमधील ठेवलेले १० हजार रूपयांची रोकड आणि लहान मुलांचा मनी बँक ची चोरी केल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी त्यांनी सोमवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास पाटील करीत आहे.