आयपीएल आणि क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. आयपीएल २०२० संपल्यापासून चर्चेत असलेली पुढील आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होण्याची योजना बारगळू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएल २०२१ मध्ये दहा संघासह आयपीएल खेळण्यास असमर्थ असल्याचे बोलले जात आहे. याबाबतची घोषणा २४ डिसेंबरला होऊ शकते.
आयपीएल १४ मध्ये नाही दिसणार दहा संघ
आयपीएल २०२० च्या समाप्तीनंतर पुढील आयपीएलमध्ये १० संघ खेळवले जाणार आहेत, अशी चर्चा होती. मात्र, आता ही योजना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका अग्रगण्य वृत्तपत्राच्या बातमीनुसार, “पुढील आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आणखी एक वर्ष ही स्पर्धा ८ संघांसोबतच होईल. २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल.”
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, “आयपीएल २०२१ मध्ये दोन नवीन संघ सहभागी करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी नव्या खेळाडूंचा लिलाव करावा लागेल. या सर्वांसाठी वेळ अत्यंत कमी आहे. दहा संघासह आयपीएल खेळण्याची कल्पना २०२२ मध्येच पूर्णत्वास येऊ शकते. स्टार स्पोर्ट्स या प्रसारण वाहिनीशी बीसीसीआयने २०२१ पर्यंत करार केला आहे. २०२१ मध्ये दोन नवीन संघ सहभागी झाल्यास, ९४ सामने खेळले जाऊ शकतात. अशावेळी, प्रसारण हक्कातून बीसीसीआयला तोटा होऊ शकतो.”
नवीन संघ खरेदी करण्यासाठी अनेक जण आहेत इच्छुक
आयपीएल २०२१ मध्ये दहा संघ खेळतील अशी बातमी आली असताना, अदानी समूह अहमदाबाद फ्रेंचायझी विकत घेण्यासाठी इच्छुक आहे. अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार झाले असल्याने त्यांचीही इच्छा आणखी वाढली होती. तसेच, यापूर्वी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाची मालकी असलेले संजीव गोयंका हेदेखील एक संघ घेण्यासाठी इच्छुक होते. दाक्षिणात्य अभिनेते मोहन लाल यांनीदेखील आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्यासाठी रस दाखवला आहे.