यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील कोळन्हावी डांभुर्णी शिवारातील जळगाव धानोरा रस्त्यावर एका अज्ञात महिलेने अवघे एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक रस्त्याच्या बाजूला सोडून पलायान केल्याची घटना रविवारी उघडकीस आल्याने परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे. या शिवारातील शेतात काम करणा-या मजुरांच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे अर्भकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . प्रथम उपचार करून या अर्भकाला जळगाव पाठवण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की रविवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास कोळन्हावी डांभुर्णी शिवारातील एका शेतात शेताच्या बांधावर अर्भकाला सोडून पलायन केल्याची घटना शेतमजूर महिलेसह पिक सरंक्षण सोसायटीचे रखवालदार देविदास सोळंके यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी याबाबत तात्काळ डांभुर्णीचे पोलिस पाटील किरण कचरे यांना याबाबतची माहिती कळविली परिसरात लोकांकडून सांगण्यात येत आहे की लाल रंगाची साडी परिधान केलेली महिला व पुरुष हे दुचाकीने आले होते.
शेतमजूर महिलेसह पिक सरंक्षण सोसायटीचे रखवालदार देविदास सोळंके यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी याबाबत डांभुर्णीचे पोलिस पाटिल यांना माहिती देत पोलिसांच्या मदतीने अर्भकास सुरुवातीला यावल ग्रामीण रूग्णालयात व नंतर जळगावला उपचारार्थ नेण्यात आले.
पोलिस पाटील किरण कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यावल पोलिस स्टेशनला त्या अज्ञात महीले विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत असुन पोउनि खैरनार अडावदचे सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश तांदळे यांच्याशी संपर्क साधुन या एक दिवसाच्या जिवंत अर्भकास सोडुन पसार झालेल्या महिलेचे शोध घेण्याचा दिशेने शोध घेण्यास पोलीसांच्या तपासाला वेग आला आहे .