पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील ओझर येथुन जवळच असलेल्या काकनबर्डीच्या टेकडीवर खंडेराव महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे. तालुक्यातील काकनबर्डी येथील यात्रोत्सव यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधीचे परिपत्रक १५ डिसेंबरला पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी काढले असुन सुद्धा आज भाविकांसह अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती.
या ठिकाणी अनेक वर्षांपासून यात्रोत्सव होत असतो. यावर्षी २० डिसेंबर २०२० रोजी ही यात्रा भरणार होती. मात्र कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने दक्षता म्हणुन सदरची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असुन पाचोरा पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदेश दिले होते.
प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाविक भक्तांनी काकनबर्डी येथे यात्रोत्सवासाठी व व्यावसायिक बांधवांनी कोणतेही दुकाने, मनोरंजनात्मक पाळणे आदी न लावण्याचेही आवाहन करण्यात आले होते. परंतु अनेक भाविकांनी याठिकाणी गर्दी केली होती. यामुळे सदरहु आदेशाचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसुन आले आहे.