जळगाव – कोरोनामुळे लॉकडाउनच्या कालावधीत तब्बल ९ महिने साऊंड सिस्टीम, डिस्क जॉकी हा व्यवसाय बंद होता. यामुळे व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली होती. जळगाव जिल्हा साऊंड असोसिएशनच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून साऊंड सिस्टीम, डिस्क जॉकी या व्यवसायाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परवानगी दिली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, तसेच पालकमंत्री यांना वारंवार निवेदनही देण्यात आले होते. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ११ डिसेंबरला पत्र काढून काही अटी शर्तीवर परवानगी दिली आहे.
यात ३० ते ४० नागरिकांच्या उपस्थितीत वाद्य वाजवण्यासह ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक काही नियमही लागू केले आहेत. यासह वाद्य वाजवण्यासाठी शासकीय विभागाच्या आवश्यक त्या परवानग्याही घ्याव्या लागणार आहेत. हे व्यवसाय सुरू करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश गवळी, उपाध्यक्ष संदीप धांडे, सचिव भागवत पाटील, सागर सोनार, दिनेश वंजाळे, कैलास महाजन यांनी पाठपुरावा केला.