जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या कोरोना व्यतिरिक्त सेवांचा (नॉन कोविड) प्रारंभ गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी सुरू झाला आहे. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निंभोरा ता. रावेर येथील रत्नाबाई एकनाथ भिल (वय ४०) यांना पहिला केसपेपर देऊन “ओपीडी” सुरू करण्यात आली.
यावेळी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, प्रशासकीय अधिकारी आर.यु. शिरसाठ, प्र. अधिसेविका कविता नेतकर, डॉ. सतीश सुरळकर, डॉ.संजय बनसोडे आदी उपस्थित होते. सकाळी सुमारे दीड तास सर्व विभागांची तपासणी करून अधिष्ठाता, उप अधिष्ठाता व अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. रुग्णांशी देखील संवाद साधला.
कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून ५ एप्रिल २०२० पासून घोषित झाले होते. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी १६ डिसेबर पासून हे रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त सेवा देण्यासाठी सुरु करण्याची घोषणा केल्यावर गुरुवारी कोरोना व्यतिरिक्त वैद्यकीय सेवा प्रारंभ झाली. रुग्णालयात औषधांचा साठा देखील मुबलक उपलब्ध आहे.
दिवसभरात स्त्री रोग, बालरोग, अपघात, विषप्राशन, दुखापती, सर्दी-खोकला, ताप, डोळे तपासणी, नाक-कान-घसा, लसीकरण, मधुमेह, हृदयरोग, दंतचिकीत्सा, किडनी आजार, प्राण्यांचे चावे, सोनोग्राफी, अस्थिविकार, मलेरिया, डेंग्यू, फुफ्फुस संबंधित, मणका-सांध्याचे आजार याबाबत उपचार घेण्यासाठी रुग्ण दवाखान्यात आले. रक्त, लघवी तपासणी विभाग देखील अद्ययावत झाला असून अहवाल तातडीने १५ मिनिटांच्या आत प्राप्त होत आहे. सकाळी ८. ३० वाजेपासून १२. ३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७९ पुरुष व ५४ महिला अशा १३३ रुग्णांनी ओपीडीतील वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला.
रुग्णांच्या बोलक्या प्रतिक्रिया
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त सेवा सुरु झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते. उपचार घेण्यासाठी शहरात मध्यवर्ती जागेत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गुरुवारी सकाळपासून उपचारासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक आले होते. यातील काही जणांनी तर ‘देव पावला’ अशी बोलकी प्रतिक्रिया देत रुग्णसेवेबाबत समाधान व्यक्त केले. वृद्ध, दिव्यांग, लहान बालके, गर्भवती महिला यांच्यासह सर्व वर्गातील स्त्री-पुरुष उपचारासाठी आले होते.