जळगांव ;- जळगाव जिल्हयात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे खालील जिल्हास्तरीय प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदसमोर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हयातील आशा स्वयंसेविका व
गटप्रवर्तकांचे प्रश्न खालील प्रमाणे –
१. राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अनुक्रमे २०००/- व ३०००/- रुपये मोबदल्यात दरमहा वाढ करण्याचा शासनाने दिनांक १७/०७/२०२० रोजी निर्णय घेतलेला आहे. आमच्या माहितीप्रमाणे सदर शासन निर्णयानुसार जुलै २०२० ते ऑक्टोंबर २०२० या कालावधतील मानधनवाढीचा निधी आपल्या कार्यालयाला प्राप्त झालेला आहे असे असतांना जळगांव जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सदरची मानधनवाढ आजतागायत अदा करण्यात आलेली नाही.
परिणामी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. तरी सदर कालावधीतील मानधनवाढीची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी.राज्यात कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता मा. मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमा अंतर्गत आशा स्वयंसेविकांना १५०/- रुपये तसेच टिममधील स्वयंसेवकांना १००/- दैनिक भत्ता मंजूर करण्यात आला आहे. परंतु आशा स्वयंसेविकांना तसेच टिममधील स्वयंसेवकांना सदरचा दैनिक भक्ता आजतागायत अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक यांच्यात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. या बाबीचा विचार करुन माझे कुटुंब माझी जबाबदारीचा दैनिक भत्ता तातडीने अदा करण्यात यावा.
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना सन २०२०-२१ पासुन गणवेशासाठी (साडी) प्रत्येकी १२००/- रुपये मंजूर केले असल्याचे गा. अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य नागरी अभियान, मुंबई यांनी आदेश पारीत केले असुन आमच्या माहितीप्रमाणे त्यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला आहे. सदर आदेशानुसार जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना गणवेशाची रक्कम आजतागायत अदा करण्यात आलेली नाही. याउलट आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांकडून प्रत्येकी १०००/- रुपये वरिष्ठ मागत असल्याच्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. या गंभीर बाबींचा विचार करुन चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच गणवेशाची रक्कम तातडीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.
४. प्राथमिक आरोग्य केंद्र, तरवाडे, ता. चाळीसगाव जि. जळगांव च्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन सुरु असतांना दि. २४ जुलै २०२० रोजी आशा स्वयंसेविकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून परिसरातील गवत धमक्या देवून काढण्यास भाग पाडले होते तसेच आशा स्वयंसेविकांची प्रतिमा मलीन केली आहे. याबाबत संघटनेने गवत काढण्यास भाग पाडणान्या आणि प्रतिमा मलीन करणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार वरिष्ठ पातळीवर केली होती. त्या अनुषंगाने मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक यांनी दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२० रोजी आपल्या कार्यालयास पत्र देवून संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्यांवर पत्राच्या दिनांकापासून १५ दिवसात कारवाई करुन अहवाल सादर करावा असे आदेशित केले आहे.
परंतु आपल्या कार्यालयाने संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्यांवर आजपावेतो कोणतीही कारवाई केलेली नाही. तरी मा. उपसंचालक यांच्या आदेशान्वये सासडीने कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाई माहिती संघटनेला कळवावी. सन २०१९-२० मध्ये जिल्हयात कुष्ठरोग व क्षयरोग तपासणीसाठी आशा स्वयंसेविकांकडून सर्व्हे करण्यात आला होता. सदर सर्व्हेसाठी असलेला कामाचा मोबदला आशा स्वयंसेविकांना तात्काळ मिळणे अपेक्षित होते. परंतु जिल्हयातील आशा स्वयंसेविकांना वर्षे उलटूनही सदर कामाचा मोबदला आपल्या कार्यालयाने अदा केलेला नाही. तरी सदर कामाचा मोबदला तातडीने आशा स्वयंसेविकांना अदा करण्यात यावा.
वरील प्रश्नां व्यतिरिक्त जिल्हा पातळीवर आशा स्वयंसेविका व गटप्रतर्वकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सदर प्रश्नांबाबत संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. परंतु जिल्हा परिषदेने वरील प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केलेले आहे. म्हणून वरील प्रलंबित जिल्हास्तरीय प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतकांच्या प्रतिनिधींचे दिनांक १७/१२/२०२० पासून बेमुदत धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर धरणे आंदोलनात रामकृष्ण बी. पाटील यांच्यासह कल्पना भोई, भगिरथी पाटील, भारती नेमाडे, सुनंदा पाटील, सुनिता भोसले, भारती तायडे, माया बोरसे, भारती चौधरी, अनिता कोल्हे,आडफिनी आंदोलनात सहभाग घेतला.