जळगाव प्रतिनिधी । जामनेर बसमध्ये चढत असतांना नवीन बसस्थानकाजवळून विवाहितेच्या पर्स मधून १२ हजार रूपये किंमतीचे दागीने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज दुपारी २ वाजता घडली. विवाहितेच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नशिराबाद येथील निर्मला विलास वाणी (वय-४८) ह्या कुटुंबियांसोबत राहतात. बुधवार १६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास निर्मला वाणी ह्या आई दुर्गाबाई सवकर व बहिण मंगलाबाई आखाडे यांच्यासह चुलतबहिणीच्या लग्नासाठी जाण्यासाठी नशिराबाद येथून रिक्षाने जळगाव येथे दुपारी १.२० वाजता नवीन बसस्थानकात आल्या. तिघांना साबळदबारा गावी जाण्यासाठी त्यांनी दुपारी २ वाजता बस लागली होती.
जामनेर बसमध्ये चढत असतांना निर्मला वाणी च्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी १२ हजार रूपये किंमतीची ४ ग्रॅम सोन्याची ठुशी व ८०० रूपये किंमतीचा चांदीचा कमरेचा छल्ला लांबविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बसस्थानक परिसरात शोधाशोध सुरू केली मात्र मिळून न आल्याने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. निर्मला वाणी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.