भुसावळ प्रतिनिधी । शहरातील वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर चार गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी तयार केले आहेत.
बाजारपेठ आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन उपद्रवींचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. चौघांचे नाव पोलिसांनी गुप्त ठेवली आहेत. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांची जंत्री काढण्यात आली आहे.
त्यापैकी चौघांचे हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले जाणार आहेत. लवकरच हे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठवले जातील. डीवायएसपी वाघचौरे यांनी नेमक्या कोणत्या गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव केलाय याबाबत आता उत्सुकतेचे वातावरण लागले आहे.