एरंडोल प्रतिनिधी । तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आडगाव येथील ढोली शिवारात वीज पडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सांयकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
रविंद्र प्रभाकर महाजन(वय २२) व महेंद्र उखर्डू पाटील( वय २३) असे मृतांचे नावे आहेत. हे दोघजण ढोली शेत शिवारातील उखर्डू पाटील यांच्या शेतात कपाशी वेचणीसाठी गेले होते. मात्र, सायंकाळी अवकाळी पावसासह विजांचा कडकडाटला सुरुवात झाली असून वातावरण पाहून घरी येण्यासाठी तयारी करत असताना, झाडाखाली उभे असलेल्या रवींद्र महाजन व महेंद्र पाटील यांच्या अंगावर वीज कोसळली.
त्या दोघांना तात्काळ कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टारांनी मृत घोषित केले. ही ५:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेबाबत पोलीस स्टेशनला ही उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. पुढील तपास एपीआय जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. गावासह कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.